कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : 'गणपतीला गावी जायचं' या एका ओढीवर कोकणी माणूस गणेश उत्सवाची वर्षभर वाट पाहत राहतो. गणेशत्सोवात (Ganeshotsav) चाकरमान्यांची पावलं आपोआप कोकणाकडे वळतात.  कोकणात गणेशोत्सव मोठ्या आनंदात, उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातो. या काळात मिळेल त्या वाहनाने चाकरमनी कोकणात जात असतो. गणेशोत्सवासाठी कोकणात (Kokan) जाणाऱ्या या गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत टोल माफी (Toll Free) देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.


गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश  मुख्यमंत्र्यांनी 14 ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने टोल माफीचा शासन निर्णय जारी केला आहे.


या टोलमाफी सवलतीसाठी 'गणेशोत्सव 2024, कोकण दर्शन' अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे टोल माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या आणि आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.


तसंच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ही टोल माफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येतील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.