मुंबई : आता राज्यातल्या सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन मिळणार आहे. जी दुकानं किंवा सुपरमार्केट एक हजार स्क्वेअर फुटांपेक्षा मोठी आहेत, अशा दुकानांमध्ये वाईन मिळणार आहे.  महाराष्ट्रातच तयार झालेली वाईन सुपरमार्केटमध्ये विकता येणार आहे.महाराष्ट्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा प्रकार'
राज्य सरकारच्या निर्णयाला भाजपाने तीव्र विरोध केला आहे. शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 


सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच, महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी  सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, अशी मागणी केली आहे.


राज्यात पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी देण्यात आली आहे, महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय घेतला गेला आहे, आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू अशी टीका करत महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.