मुंबई : गेल्या २४ तासात ७५ पोलीस कर्मचाऱ्यांची कोविडची ( COVID-19)चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलिसांमधील एकूण कोरोना पॉझिटिव्हची संख्या १९६४ झाली असून मृत्यूची संख्या २० वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण ८४९ पोलीस कर्मचारी बरे झाले आहेत. १०९५ कर्मचारी हे कोरोना संक्रमित आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी एएनआयला दिली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांना कोरोनाची बाधा होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी विश्रांती देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील १० पोलीस आणि १ अधिकारी असे एकूण ११, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण १, ए.टी.एस.१, ठाणे शहर १ अशा १८ पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात सध्या ९० पोलीस अधिकारी आणि ३५२ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.



राज्यात एकूण १३५३  रिलिफ कॅम्प आहेत. तर जवळपास ८२,४२२ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी  लॉकडाऊनच्या काळात सर्व नियमांचे पालन करुन कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करावे. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. या काळात  सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.



दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४२६ गुन्हे दाखल झाले असून २३३ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.


राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४२६ गुन्ह्यांची  नोंद २५ मे २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १७८ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १६७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.