मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असला तरी एक चांगली बातमी आहे. राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात ४० हजार ९७५ कोरोना बाधित रुग्ण एकदम ठणठणीत झाले आहेत. तर  ४४ हजार ३७४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचा सोमवारी १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्याचवेली कोरोनाच्या २५५३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सोमवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



राज्यात १०९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७० (मुंबई ६४, कल्याण-डोंबिवली २, उल्हासनगर १, वसई-विरार १, भिवंडी १, ठाणे १), नाशिक- १३ (नाशिक २, जळगाव ६, धुळे ४, अहमदनगर १), पुणे- १३ (पुणे ७, सोलापूर ६), कोल्हापूर- ३ (रत्नागिरी ३),औरंगाबाद-९ (औरंगाबाद ८, जालना १), लातूर-१ (नांदेड १).


सोमवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ३८ महिला आहेत. तर काल नोंद झालेल्या १०९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५९ रुग्ण आहेत तर ४४  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ६ जण ४० वर्षांखालील आहे. या १०९ रुग्णांपैकी ७९ जणांमध्ये ( ७२.५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३१६९ झाली आहे.



राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतीयोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३५१० झोन क्रियाशील असून काल एकूण १७,८९५ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६६.८४  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.