मुंबई: ठाकरे सरकारच्या बहुचर्चित कर्जमाफी योजनेची पहिली यादी सोमवारी प्रसिद्ध होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला  महाविकासआघाडीची पार पडल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे कर्जमाफीसाठी निवडण्यात आली आहेत. याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, हे पाहून कर्जमाफीची पुढील यादी प्रसिद्ध होती. मात्र, मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरी यादी २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होतील. यानंतर मार्च ते एप्रिल या कालावधीत टप्प्याटप्याने कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. नावांची पडताळणी करूनच याद्या प्रसिद्ध होतील. जेणेकरून कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या संख्येबाबात कोणतीही शंका राहणार नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


'भाजपने वारेमाप आरोप करू नयेत, समजुतदार विरोधी पक्षाप्रमाणे वागावे'


गेल्या सरकारने कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर सात महिन्यांनी निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. ही अंमलबजावणी अजूनपर्यंत सुरु आहे. मात्र, आमचे सरकार निश्चित कालावधीत कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करेल, याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सरकारने ३५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची यादी तयार केली आहे. त्यामुळे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, असेही सरकारतर्फे सांगण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी महाविकासआघाडीकडून राज्याच्या अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी आकस्मिक निधीत १५ हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात येऊ शकते.


'विरोधकांना चांगली कामे दिसत नसतील तर मोफत चष्मे देऊ'


आमचे सरकार आता स्थिरावले असून कामही करत आहे. हीच गोष्ट विरोधकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे ते सरकारवर वारेमाप आरोप करत आहेत. शिवभोजन योजना सुरु झाल्यानंतरही भाजपने सरकारवर टीका केली. एकतर स्वत: काही करायचे नाही आणि इतरांनी काही केले तर त्यावर टीका करायची अशा भाजपची कार्यपद्धती आहे. मात्र, विरोधी पक्षाने डोळे उघडे ठेवून सरकारची चांगली कामेही पाहिली पाहिजेत. त्यांचे वय ६ ते ११ मध्ये असेल त्यांना सरकारी योजनेतून मोफत चष्मे देऊ, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.