दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीतल्या खाते वाटपाचा तिढा आणखी वाढला आहे. खाते वाटपात शिवसेनेच्या वाट्याला तब्बल २४ खाती आल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये अवस्थता आहे. पहिल्या खातेवाटात शिवसेनेकडे २४, राष्ट्रवादी १३ आणि काँग्रेसकडे ११ खाती गेली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेकडे गेलेली जादा खाती मिळवण्याचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रयत्न आहे. खातेवाटपात शिवसेनेकडे मुख्यमंत्री पदासह सगळ्यात जास्त खाती गेल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीकडून यातील खाती मिळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे खाते वाटपावर पुन्हा चर्चा होणार आहे. 


३० तारखेला नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर १-२ दिवसात खातेवाटप होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. पण या गोंधळामुळे खातेवाटप लांबण्याची चिन्हं आहेत.


संजय राऊत यांच्या फेसबूक पोस्टचा अर्थ काय? अजूनही नाराज असल्याची चर्चा


मंत्रिपदं आणि खात्यांवरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागाशी निगडीत असलेले कृषी खाते हे ज्येष्ठ आणि विश्वासू अशा सुभाष देसाई यांच्याकडं सोपवले जाण्याचे संकेत सामना या वृत्तपत्रातून दिलेत पण काँग्रेसला शिवसेनेच्या ताब्यातलं कृषी किंवा राष्ट्रवादीच्या ताब्यातलं ग्रामविकास खातं हवंय. त्याचसाठी बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली.


इतर मलईदार खात्यांसाठी शिवसेनेतही रस्सीखेच आहे. गृह खात्यावरुन राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख आणि दिलीप वळसे पाटील या ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये रस्सीखेच आहे. नवाब मलिकांना प्रस्तावित उत्पादन शुल्क खातं नकोय, कामगार खात्यावर त्यांचा डोळा आहे.


धनंजय मुंडेंच्या रिकाम्या होणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेमधून उद्धव ठाकरेंचा विधिमंडळात शिरकाव होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना चांगलं खातं मिळण्यासाठी अजित पवार आग्रही आहेत. अमित देशमुख यांना उर्जा खातं तर आदित्य ठाकरे यांना पर्यावरण, उच्चशिक्षण खातं मिळण्याची शक्यता आहे.


तीन पक्षांतल्या इच्छुकांचं समाधान करणं, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोरचं मोठं आव्हान आहे. आता खातेवाटपात उद्धव ठाकरे धक्कातंत्र वापरणार का, याची उत्सुकता आहे.