मुंबई :  Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोविड-19चे ( Covid-19) निर्बंध अद्याप आहेत. त्यामुळे मंदिरे (Temples) खुली करण्यात आलेली नाही. विरोधकांकडून सातत्याने मंदिरे खुली करण्याची मागणी होत आहे. मंदिरे न उघडल्याने राज्य सरकारवर विरोधकांकडून सात्याने हल्लाबोल करण्यात येत आहे. आता राज्य सरकारकडून मंदिरे खुली करण्याबाबत संकेत दिले आहेत. (Mahavikas Aghadi government signals to open temples in Maharashtra) दसरा-दिवाळीनंतर मंदिरे खुली करण्याचे  संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. कोरोना आटोक्यात आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार आहेत, असे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंदिरे खुली करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. याविरोधात भाजपने राज्यभरात शंखनाद आंदोलन सुरू केले होते. अनेक ठिकाणच्या मंदिराच्या बाहेर कार्यकर्त्यांनी शंखनाद आंदोलन केले.


कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील बहुतेक जिल्ह्यांतील निर्बंध उठवण्यात आले आहेत. दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. शाळा आणि मुंबई लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र, धार्मिक स्थळे उघडण्याबाबत अद्याप कुठलेही आश्वासन देण्यात आलेलं नाही. त्यावरून भाजपकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला. हिंदूविरोधी हे सरकार आहे, अशी टीकाही भाजपकडून करण्यात आली. 


कोविड-19 या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आहे. त्यामुळे सरकार सावध पावलं उचलत आहे. अनेक गोष्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विरोधकांकडून सातत्याने मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे यावरील बंदी उठविण्याची मागणी केली आहे. मात्र, सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केल्याने राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच आहेत.