मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) इथं शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेने (Shivsena) आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे. यानिमित्ताने आज महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत बंदला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं.


शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ 11 ऑक्टोबरला लखीमपूर खेरमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत जो अमानुष प्रकार घडला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारला आहे. त्या बंदला महाविकास आघाडीतील तीनही पक्ष सक्रीय पाठिंबा देतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. शिवसेना या बंदमध्ये सहभागी आहे की नाही असा प्रश्न विचारला जात होता, पण शिवसेना या बंदमध्ये पूर्ण ताकतीने उतरणार आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. 


देशाची परिस्थिती आपल्याला माहित आहे, देशात इतके प्रश्न आहेत, की प्रत्येक प्रश्नावर रोज एक बंद झाला पाहिजे. पण बंदमुळे लोकांची गैरसोज, राज्याचं नुकसान होतं हे मान्य करतो. पण लखीमपूरमध्ये जे घडलं ते या देशाच्या संविधानाची हत्या आहे. कायद्याची पायमल्ली आहे. जो अन्नदाता शेतकरी आहे त्यांना संपवण्याचं हे षडयंत्र आहे. या सरकारने ठरवलं तर राज्या राज्यात लखीमपूर खेरी सारख्या घटना घडवतील. इतकं हे केंद्र सरकारच्या नसानसात भरलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.


देशातील जनतेला जागं करण्यासाठी, शेतकरी एकटा नाही आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, आणि याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी, यासाठी महाविकास आघाडी सरकारने 11 तारखेला महाराष्ट्रात बंद पुकारला आहे. या बंदमध्ये तिनही पक्ष सहभागी होतील. जिथे जिथे आपलं सरकार आहे तिथल्या राज्यांनी टप्प्याटप्प्याने बंद पुकारावा आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पाठिंबा द्यावा. त्याशिवाय या निर्घृण कृतीला आळा बसणार नाही, अन्नदाता एकटा नाही हे दाखवण्याची ही वेळ आहे, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.


भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नाही


भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नाही, शेतमालाची लूट करणारा पक्ष आहे, त्यासाठी कायदे करण्यात आले, आता तर शेतकऱ्यांची हत्या करणारा पक्ष आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. तीनही पक्षांनी ठरवलं शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिले पाहिजे, यासाठी तिनही पक्षांनी सोमवारी 11 तारखेला महाराष्ट्र बंद पुकारला आहे. रात्री 12 वाजल्यापासून या बंदला सुरुवात होईल, या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.


या बंदला सर्वांनी स्वत: साथ दिली पाहिजे, दुकानदारांनी आपली दुकानं बंद ठेवली पाहिजे, महाराष्ट्र बंद नंर याचे पडसाद देशभर दिसतील, तीनही पक्षाचे कार्यकर्ते लोकांना हात जोडून विनंती करतील बंद सहभागी होण्यासाठी अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. 


मानवतेला कलंक लावणारी घटना


लखीमपूर खेरमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालणं ही मानवतेला कलंक लावणारी घटना असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना शत्रू समजलं जातं, सत्तेच्या दंभातून ही भूमिका आल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला. प्रियंका गांधी शेतकऱ्यांना भेटायला गेल्या, त्यांना जेलमध्ये टाकलं, पण हत्या करणारा मोकाट असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे. हा बंद शेतकऱ्यांवरील अन्यायाचा आवाज आहे. तीन पक्ष एकत्र येऊन हा बंद पुकारतो आहे, तो यशस्वी होईल असा विश्वासही सचिन सावंत यांनी व्यक्त केला आहे.