फडणवीसांच्या निवडणुकीच्या आव्हानावर महाविकासआघाडीची टीका
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून समाचार
मुंबई : भाजपमध्ये हिंमत असेल, तर आमचं सरकार पाडून दाखवावं, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या आव्हानाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हिंमत असेल तर पुन्हा जनादेशासाठी निवडणूक घेऊन दाखवा. आम्ही एकटे असलो तरी तुम्हा तिघांवर पुरून उरु, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. सरकार पडणार नाही, आम्ही पाच वर्षे चांगलं काम करू असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. तर फडणवीस यांनी जपून बोलावं, एक एक जण या, बघून घ्यायला हा काही कुस्तीचा आखाडा नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे.
भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं. सरकार पाडण्याचे नसते उद्योग करण्यापेक्षा भाजपने विरोधी पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'विरोधी पक्षनेत्यांचे 'हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढवून दाखवा' विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकलणाऱ्यांना पुन्हा निवडणूक परवडणार नाही, ही जाणीव नाही. निवडणूक हा खेळ वाटला का? अंधारात कारस्थानाने शपथ घेणारे फडणवीस सत्तेच्या हव्यासापोटी आंधळे झाले आहे', असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सरकार आम्ही पाडणार नाही. तर त्यांच्या कर्मानेच सरकार पडेल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.