दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. यामुळे आता काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. शुक्रवारी रात्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. काँग्रेसच्या नाराजीच्या कारणांबाबत सोमवारी चर्चा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी थोरात यांना दिलं आहे. त्यामुळे सोमवारी बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसला सरकारमध्ये मिळत असलेलं दुय्यम स्थान, निर्णय प्रक्रियेतील सहभाग, विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांचे वाटप यावर चर्चा होणार आहे. दरम्यान काल रात्री काँग्रेसचे मंत्री सुनिल केदार यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र ही भेट त्यांच्या खात्यातील काही विषयासंदर्भात होती. काँग्रेसच्या विषयाबाबत सुनिल केदार मुख्यमंत्र्यांना भेटले नसल्याचा खुलासा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. 


महाविकासआघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची गुरुवारी मुंबईमध्ये बैठक झाली. महाविकासआघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान देण्यात यावं, अशी मागणी या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी केली होती. या बैठकीनंतर आता काँग्रेस नेते त्यांची तक्रार घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत. 


काय आहेत काँग्रेसच्या नाराजीची कारणं?


महाविकासआघाडी सरकार चालवताना निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी केलं जात नसल्याचा आक्षेप काँग्रेस नेते आणि मंत्र्यांचा आहे. कोरोनाच्या संकटात घेण्यात येत असलेले निर्णय तिन्ही पक्षांशी चर्चा करून घेणं काँग्रेसला अपेक्षित आहे. सध्याच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसतंय, अशी काँग्रेसची धारणा झाली आहे. त्यामुळे सरकारमध्ये अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची खदखद काँग्रेसमध्ये आहे. 


महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री न मिळाल्याने, विधान परिषदेत एक जागा कमी मिळाल्यामुळे आणि आता निर्णय घेताना स्थान मिळत नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. 


राहुल गांधींचं वक्तव्य


याआधी काँग्रेस नेते राहुल गांधींनीही आम्ही महाराष्ट्रात सत्तेत असलो, तरी मोठे निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते. हे म्हणत असताना राज्यातलं सरकार मजबूत आणि स्थिर असल्याचंही राहुल गांधींनी सांगितलं. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला. सरकारमध्ये काँग्रेसचा योग्य सन्मान राखला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना दिलं.