प्रदेश भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठ्या फेरबदलांची शक्यता... आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती
भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आता ज्या जागी इतर व्यक्तीस जबाबदारी देण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत.
मुंबई : भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आता ज्या जागी इतर व्यक्तीस जबाबदारी देण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जागी ओबीसी चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे किंवा राम शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या जागी पुन्हा आशिष शेलार यांच्याकडे जबाबदारी द्यायच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
पाटील यांची टर्म डिसेंबर अखेर संपत आहे. त्यांची टर्म संपण्याआधीच नवीन प्रदेश अध्यक्ष निवडणार की, पाटील कार्यकाळ पूर्ण करणार याची चर्चा सुरू आहे. भाजपा ओबीसी समाजाची राजकीय मूठ पुन्हा नव्याने बांधू पाहत आहे. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीसाठी ओबीसी चेहरा असावा असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यामुळे बावनकुळे यांचे नाव सर्वाधित चर्चेत तर राम शिंदे त्यांचाही विचार केला जावू शकतो.
मुंबई मनपा निवडणुका आणि शेलार पुन्हा मैदानात…
ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत असलेली मुंबई मनपातील सत्ता खाली खेचण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. आशिष शेलार यांच्याकडे पुन्हा जबाबदारी द्यायची हालचाली सुरू आहेत. कॅबिनेट मंत्रीपदी शेलार यांना संधी दिली नसली तरी भाजपा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक पाहता मुंबई भाजपा अध्यक्ष जबबदारी द्यायच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. शेलार यांच्या समवेत अतुल भातखळकर, योगेश सागर यांची नाव चर्चेत आहे. पण शेलार यांचे नाव आघाडीवर आहे. पक्ष संघटनात्मक बदल येत्या काही दिवसात होतील अस सूत्रांनी सांगितले.