मुंबई : तुम्ही मास्क घातलेला नाही, सार्वजनिक ठिकाणी थुंकलात तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई ही होणारच. हा दंड वसूल करण्यासाठी महापालिकेने नेमणूक केली आहे ती क्लीन अप मार्शलची. पण, हेच मार्शल नागरिकांकडून जबरदस्ती करून दंड वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन पालिकेने नागरिकांसाठी एक आवाहन केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड १९ विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रात मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच, एकदा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास या प्रत्येक उल्लंघनासाठी रुपये २०० प्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाते.


ही कारवाई करण्यासाठी नेमलेल्या क्लीन अप मार्शल यांना दंड रक्कम देण्यापूर्वी नागरिकांनी त्याने गणवेष परिधान केलेला असावा, त्या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व अनुक्रमांक नमूद केला आहे कि नाही याची खातरजमा करावी. तसेच, दंड रक्कमेची पावती घ्यावी, याअनुषंगाने कोणत्याही तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ वर संपर्क साधावा, असं आवाहन केलंय. 


प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी एक याप्रमाणे खासगी सुरक्षारक्षक क्लीन अप मार्शल संस्थांची नेमणूक दंडात्मक कारवाईसाठी केली आहे. या संस्थांचे क्लीन अप मार्शलने गणवेष परिधान केलेला नसेल, त्यांच्या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व त्यांचा अनुक्रमांक लिहिलेला नसेल तर अशा मार्शलची  
तक्रार टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे.