मुंबई: विक्रोळी-घाटकोपर दरम्यान एलबीएस मार्गावर असलेल्या पालिकेच्या उघड्या गटारात पडून एक इसम वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्यावरून चालणारा एक व्यक्ती मोठ्या गटारात पडत असल्याचे काहीजणांनी पाहिले. यानंतर संबंधित लोकांनी अग्निशमन दलाला याबाबत कळवले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपतकालीन विभागाच्या पथकाने या ठिकाणी शोध मोहीम देखील राबवली. मात्र, या व्यक्तीचा पत्ता लागू शकला नाही. गटारात वाहून गेलेली ही व्यक्ती ६८ वर्षाचे प्रदीप कामदार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


काही दिवसांपूर्वीच गोरेगाव येथे दोन वर्षांचा दिव्यांश गटारात वाहून गेला होता. दिव्यांशला शोधण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आले होते. मात्र, अनेक दिवसांच्या शोध मोहीमेनंतरही दिव्यांशचा मृतदेह सापडू शकला नव्हता. त्यामुळे लोकांमध्ये महानगरपालिकेविषयी रोष निर्माण झाला आहे. 


यानंतर सायनच्या धारावी परिसरातही अमित मुन्नालाल जैसवार या सात वर्षांच्या मुलाचा नाल्यात पडून मृत्यू झाला होता. अमित नाल्याच्या काठावर खेकडे पकडत होता. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो थेट नाल्यात जाऊन कोसळला. अमित बुडत असल्याचे पाहून स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अमितच्या नाकातोंडात बरेच पाणी गेले होते. स्थानिकांनी अमितला नाल्यातून बाहेर काढून तातडीने सायन रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे मुंबईतील उघडी गटारे आणि नाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.