Baba Siddique Killing Shocking Update About Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानसंदर्भात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सलमान खानच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता त्याला व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. असं असतानाचा आता काही आठवड्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सलमानचे निकटवर्तीय असलेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी प्रकरणामध्ये तपासादरम्यान आरोपींनी नोंदवलेल्या कबुली जबाबामध्ये, बाबा सिद्दीकींची हत्या करण्याआधी सलमान खानवर गोळीबार करण्याचा कट रचण्यात आला होता, असं म्हटलं आहे. 


सलमानवर हल्ला का केला नाही?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा सिद्दीकी प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करत असून या तपासादरम्यान, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या हिट लिस्टवर सलमान खान असल्याचं आरोपींनी सांगितलं आहे. बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर सलमान खान असल्याने बाबा सिद्दीकींऐवजी आधी त्याच्यावरच हल्ला करण्याचा हल्लेखोरांचा इरादा होता. मात्र सलमानभोवती सुरक्षेचं जाळं अधिक भक्कम असल्याने गोळीबार करणाऱ्यांना सलमानपर्यंत पोहोचता आलं नाही. त्यामुळेच त्यांनी सलमानला इशारा देण्यासाठी त्याचे निकटवर्तीय असलेल्या बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करत पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. सलमानच्या घरावर काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबारानंतर त्याला व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे सलमान आता चार स्तरांच्या सुरक्षेच्या फेऱ्यातच सगळीकडे वावरतो. म्हणूनच या हल्लेखोरांना सलमानच्या आसपासही जाता आलं नाही.


बाबा सिद्दीकींची हत्या


12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांनी अंधेरीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सलमान खानबरोबर असलेल्या खास संबंधांमुळेच बाबा सिद्दीकींना बिश्नोई टोळीने लक्ष्य केल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन शार्प शूटर्सला घटनास्थळावरुन ताब्यात घेतलं. धर्मराज कश्यप आणि गुरमहिंसह या दोघांना पोलिसांनी घटनास्थळावरुन अठक केली. त्यावेळेस मुख्य आरोपी आणि गोळीबार करणारा शिव कुमार घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याला नंतर उत्तर प्रदेशमधील बहराइट जिल्ह्यातील नानपारा येथून अटक करण्यात आली. शिव कुमारला अटक केल्यानंतर त्याने कबुली जबाबात अनेक खुलासे केले आहेत.


नक्की वाचा >> ₹20000000000 प्रकरणात दिलासा मिळाल्यावर सलमान खानची सहअभिनेत्री 25 वर्षांनी भारतात आली; Video मध्ये म्हणाली... 


दादरमध्ये सलमानच्या सेटवर घुसून लॉरेन्स बिश्नोईचा उल्लेख


एकीकडे सलमानच्या जीवाला धोका असतानाच मुंबईतील दादरमध्ये सलमान खानचं शुटींग सुरु असलेल्या सेटवर एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईचा उल्लेख करत सलमानच्या सेटवर प्रवेश केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर पश्चिममध्ये सलमानचं शुटींग सुरु होतं. सलमानच्या एका चाहत्याला शुटींग पाहायचं होतं. मात्र सुरक्षारक्षक त्याला धक्काबुक्की करत होते. या व्यक्तीला आतमध्ये जायचं होतं त्यावरुन वादावादी झाली. त्यावेळी संतापलेल्या या तरुणाने लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतलं. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या व्यक्तीला पकडून ठेवत पोलिसांना बोलावलं. हा तरुण मुंबईचा रहिवासी आहे. पोलीस आता या तरुणीची पार्श्वभूमी तपासत आहेत. प्राथमिक तपासामध्ये या व्यक्तीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलेली नाही. 'बिश्नोईला सांगू का?' असा प्रश्न या व्यक्तीने सेटवर प्रवेश नाकारल्यानंतर सुरक्षारक्षकांना विचारल्याची माहिती समोर येत आहे.