राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : आई आणि मुलाच्या नात्याची एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. एक मुलगा त्याच्या आईविरोधात कोर्टात गेला आहे. त्याचा आरोप आहे की दोन वर्षांचा असताना त्याला ट्रेनमध्ये बेवारस का सोडलं होतं. श्रीकांत सबनीस यांनी सध्या आईविरोधातच हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. श्रीकांत यांची आई उषा सबनीस आणि वडील दीपक सबनीस हे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीकांत दोन वर्षांचा झाल्यावर आईनं श्रीकांतला ट्रेनमध्ये बेवारस ठरवलं. पतीला वेडं ठरवलं आणि उदय म्हसकर नावाच्या माणसाशी लग्न केलं. बेवारस श्रीकांतचा फोटो त्यावेळी पेपरमध्ये आला होता. तो पाहून राजस्थानच्या एका जोडप्यानं त्याला दत्तक घेतलं. पण श्रीकांतच्या आजीला हे कळताच चार वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर आजीनं श्रीकांतची कस्टडी मिळवली. 


आजी आणि मावशीनं श्रीकांत यांचा सांभाळ केला. सध्या श्रीकांत सबनीस मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात. मावशीकडून सगळी कहाणी समजताच श्रीकांत यांनी आईचा शोध घेतला. पण आता आरती म्हसकर अशी ओळख असलेली त्यांची आई मुलगा म्हणून त्यांना स्वीकारायला तयार नाही. अखेर श्रीकांत यांनी हायकोर्टात धाव घेतलीय आणि गेली ३८ वर्षं मानसिक त्रास दिल्याबद्दल दीड कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.


८० च्या दशकात श्रीकांतची आई उषा पंडीत अभिनेत्री होती. महत्त्वाकांक्षी असलेल्या उषा पंडीत यांनी त्यांच्या मुलाला बेवारस सोडल्याचा आरोप श्रीकांत यांचा आहे. यासंदर्भात आरती म्हसकर बोलायला तयार नाहीत. पण आमच्या संपत्तीवर डोळा ठेवून आता श्रीकांत त्यांचा हक्क मागतायत, असं आरती यांचे पती उदय म्हसकर यांनी म्हटलंय. ही लढाई न्यायालयात लढण्याचीही त्यांची तयारी आहे.


आई-मुलाच्या नात्याचा हा विचित्र गुंता आहे. खरं तर आई-मुलाच्या नात्यातले सगळेच प्रश्न मायेनं किंवा फार फार तर चर्चेनं सुटायला हवेत. मायलेकाच्या नात्याचा हा गुंता कोर्टात जाणं नक्कीच दुर्दैवी आहे.