पतीने केले पत्नीवर चाकूने वार...
मुलांचा ताबा मिळेल की नाही या भीतीतून इम्रान खान याने (वय ३५ वर्षे) आपल्या पत्नी सोनोबरवर हल्ला केला.
मुंबई : मुलांचा ताबा मिळेल की नाही या भीतीतून इम्रान खान याने (वय ३५ वर्षे) आपल्या पत्नी सोनोबरवर हल्ला केला. त्याने तिच्या चेहऱ्यावरही वार केले, ज्यामुळे सोनोबरच्या चेहऱ्याला आणि मानेला मोठी इजा झाली. मीरा रोड भागात ही घटना घडली. सोनोबरला सध्या एका खासगी रूग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ती तिच्या वडिलांसोबत चालली होती त्यावेळी अचानक तिच्या नवऱ्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार या घटनेत सोनोबरचा जबाब नोंदवून घेण्यात आलेला नाही, त्याचमुळे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास सोनोबर आणि तिचे वडील नया नगर या बाजाराच्या ठिकाणी गेले होते, त्यावेळी अचानक इम्रान आला आणि त्याने सोनोबरवर हल्ला केला, तिला चाकूने भोसकले, तिच्या चेहऱ्यावर वार केले तिला वाचवत असताना मलाही इजा झाली असा आरोप सोनोबरचे वडिल गुलाम रसूल यांनी केला आहे.
इम्रान खान आणि सोनोबर यांचे २००७ मध्ये लग्न झाले. या दोघांनाही दोन मुले आहेत. मात्र या दोघांमध्ये सातत्याने खटके उडत असल्याने त्यांनी वर्षभरापूर्वी ठाणे कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मुलांचा ताबा आपल्याला मिळणार नाही याच भीतीमधून इम्रानने सोनोबरवर हल्ला चढवला असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला.
गुलाम रसूल आणि सोनोबर या दोघांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याची आम्ही वाट बघतो आहोत, त्यानंतर या दोघांचा जबाब आम्ही नोंदवून घेऊ अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सानप यांनी दिली.