लोकल ट्रेनमध्ये हरवलेलं पाकीट १४ वर्षांनी परत मिळालं...
अनेकदा ट्रेनमध्ये वस्तू हरवल्या, की त्या पुन्हा मिळणं म्हणजे मोठं कठिणच असतं.
मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये अनेक वस्तू हरवल्याच्या घटना समोर येतात. अनेकदा ट्रेनमध्ये वस्तू हरवल्या, की त्या पुन्हा मिळणं म्हणजे मोठं कठिणच असतं. पण तब्बल 14 वर्षांपूर्वी चोरी झालेलं पाकीट पोलिसांना मिळाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी 14 वर्षांनंतर मिळालेलं पाकीट, त्या पाकीटाचा मालक असलेल्या व्यक्तीला सोपवलं आहे.
या पाकीटामध्ये 900 रुपये होते. रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2006 मध्ये सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना, हेमंत पेडलकर यांचं पाकीट हरवलं होतं. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी, म्हणजे यावर्षी एप्रिल महिन्यात जीआरपी वाशीने त्यांना फोन करुन, पाकीट मिळाल्याची माहिती दिली.
परंतु लॉकडाऊनमुळे हेमंत पाकीट घेण्यासाठी जाऊ शकले नाहीत. लॉकडाऊन हटवण्यात आल्यानंतर पनवेलमध्ये राहणाऱ्या हेमंत यांनी वाशी जीआरपी कार्यालयात जाऊन पैशांसह त्यांचं पाकीट परत घेतलं.
'पाकीट हरवलं त्यावेळी माझ्या पाकीटात 900 रुपये होते. ज्यात नोटबंदीनंतर चलनातून बंद झालेली 500 रुपयाची जुनी नोटही होती. वाशी जीआरपीने 300 रुपये परत केले आहेत. त्यांनी स्टँप पेपरच्या कामासाठी 100 रुपये कापून घेतले. आणि इतर 500 रुपये नोट बदलण्यानंतर मिळणार आहेत', असं हेमंत यांनी सांगितलं.
जीआरपीच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हेमंत यांचं पाकिट चोरणाऱ्या व्यक्तींना काही काळापूर्वी अटक करण्यात आली होती.