Ajay Maharaj Baraskar Attack : मराठा आरक्षणासाठी सातत्याने झटणारे नेते मनोज जरांगे पाटील आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांवरील हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरात काही अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील विरुद्ध त्यांचे एकेकाळचे साथी अजय महाराज बारस्कर यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सध्या अनेक ठिकाणी बारस्कर यांच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजय महाराज बारस्कर हे मुंबईतच राहत आहेत. ते आज रात्री 8.30 च्या दरम्यान प्रवास करत असताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, अशी माहिती अजय महाराज बारस्कर यांनी दिली आहे. 


या हल्ल्यानंतर जवळच असलेल्या पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतलं. सध्या मरीन ड्राईव्ह पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय महाराज बारस्कर यांच्यावर 5 ते 6 जणांनी हल्ला केल्याचे बोललं जात आहे. त्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेनंतर बारस्कर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 


अजय बारसकरांचा हल्लाबोल


कधीकाळी मनोज जरांगेंचे खास समर्थक असलेल्या अजय महाराज बारसकरांनी (Ajay Baraskar) आरोपांची पहिली तोफ डागली. जरांगे हेकेखोर आहेत, ते दररोज पलटी मारतात, असा हल्ला चढवतानाच सरकारसोबत झालेल्या गुप्त बैठकांमध्ये नेमकं काय झालं, असा सवाल बारसकरांनी केला होता. 


मनोज जरांगे पाटील यांचा आरोप


"हा सरकारचा ट्रॅप आहे. या आरोप सत्रामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात" असल्याचा प्रत्यारोप जरांगेंनी केलाय. अजय महाराज बारसकरांमागे मुख्यमंत्र्यांचा प्रवक्ता आणि देवेंद्र फडणवीसांचा मोठा नेता असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय. सरकारनं मात्र जरांगेंच्या प्रत्यारोपांचा सपशेल इन्कार केलाय. मुख्यमंत्र्यांना असं करण्याची गरज काय, असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी जरांगेंना केलाय. 


कधीकाळी जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकत्रितपणे विजयाचा गुलाल उधळला होता. आता मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा शिंदे सरकारनं मंजूर करून घेतला. मात्र जरांगे ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवण्याच्या मागणीवर ठाम असल्यानं तिढा कायम आहे. सगेसोयऱ्यांच्या मागणीवरही जरांगे ठाम आहेत. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजानं जरांगेंच्या पाठीशी ताकद उभी केली. आता त्याच आंदोलनातल्या जुन्या सहकाऱ्यांनी जरांगेंनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. त्यामुळं जरांगेंच्या आजवरच्या यशाला गालबोट लागल्याचे बोललं जात आहे.