दीपक भातुसे, झी मराठी, मुंबई : 'ठाकरे सरकार'च्या Thackeray Sarkar मंत्रिमंडळाचा  विस्तार अखेर 30 डिसेंबर रोजी पार पडला. यावेळी महाविकासआघाडीच्या काही आमदारांना राज्यमंत्रीपद तर काहींना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर सगळ्या मंत्र्यांनी आपापल्या कार्यालयांचा ताबा घेण्यास सुरूवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र मंत्रालयात सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्र्यांसाठी तयार करण्यात आलेलं ६०२ क्रमांकाचं दालन सध्या कुणीही घ्यायला तयार नाही. या दालनात आलेला मंत्री पुन्हा मंत्रालयात येत नाही, असं २०१४ पासूनचं चित्र आहे. त्यामुळे या दालनाबाबत शुभ-अशुभची चर्चा सुरू आहे. नव्याने उपमुख्यमंत्री झालेले अजित पवारही हे दालन स्वीकारायला तयार नाहीत.


मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सत्तेच केंद्र आहे. कारण सहाव्या मजल्यावरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची दालनं आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्र्याच्या दालनानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या दालन हे सर्वात मोठं दालन आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात आता कोणताच मंत्री जायला तयार नाही. ठाकरे सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील हे दालन स्वीकारण्यास नकार दिला आहे. 


काय आहे यामागची कारणं .... 


एकनाथ खडसे सुरूवातीला या दालनात बसायचे. 9 मार्च 2013 रोजी मंत्रालयाला आग लागली. या आगीत या दालनाचं खूप मोठं नुकसान झालं. त्यानंतर या सर्व परिसराचं नुतनीकरण करण्यात आलं. त्यावेळी हे दालन उपमुख्यमंत्रीपदाचे दालन म्हणूनच बनविण्यात आलं. 


नुतनीकरणानंतर अजित पवार काही काळ ६०२ मध्ये उपमुख्यमंत्रीपदाच्या दालनात होते. आता अजित पवारांनी हे दालन स्वीकारण्यास नकार दिला आहे. अजित पवार त्या शेजारी असलेलं दालन घेणार आहेत. यामुळे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील या सर्वात मोठ्या दालनास कुणीच वाली नसल्याचं दिसून येत आहे.