`मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको` छगन भूजबळांच्या भूमिकेवरुन महायुतीत तणाव
मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसीतून नको अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. तसंच दोन दिवसांत नोंदींचा आकडा कसा वाढला असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आरक्षणावरुन अजितदादा विरुद्ध भुजबळ खडाजंगीं होण्याची चिन्ह आहेत.
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha vs OBC) वाद पेटलाय. त्यात सत्तेत सहभागी असलेल्या छगन भुजबळांच्या (Chagan Bhujbal) भूमिकेमुळे महायुतीत तणाव निर्माण झालाय. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण (Maratha Reservation) द्या, ओबीसीतून (OBC) नको अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. इतक्या जाती आहेत, यात जर हे सर्व आले तर कुणाला काय मिळणार नाही, ओबीसी तर संपूनच जाईल, असं भूजबळ यांनी म्हटलं आहे. कायद्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्ती करा आणि मग सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लढा असंहीत भूजबळांनी म्हटलंय. तसंच ओबीसी आरक्षण महाप्रयासाने मिळवलं आहे समाजाने, हे आरक्षण घालवण्याचा कट रचला जातोय, हायकोर्टाच्या माध्यमातून, केसेसच्या माध्यमातून ओबीसींना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करायचा असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद
मराठा कुणबी प्रमाणपत्रावरुन छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतलीय.. त्याचेच पडसाद राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे.. भुजबळांच्या भूमिकेला विरोध करत शिंदे गटाने अजित पवारांनाच लक्ष घालण्याची मागणी केलीय. आता अजित पवार भुजबळांबाबत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याआधी ओबीसी शासकीय कर्मचारी टक्केवारी यावरून भुजबळ आणि अजित पवारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली होती. तर भुजबळांनी मराठा आरक्षणावर घेतलेल्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच दिवाळीनंतर ओबीसी संघटनांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटलाय.. त्यात सत्तेत सहभागी असलेल्या भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीत तणाव निर्माण झालाय. तेव्हा यावर काय तोडगा काढायचा याबाबत शिंदे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
काँग्रेसचाही गंभीर आरोप
ओबीसी आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केलाय. आरक्षणाचं गाजर दाखवत भाजप मतं घेते असा हल्लाबोलही पटोलेंनी केलाय. जातनिहाय गणनेतून मागास प्रवर्गाला आरक्षणाच्या प्रवाहात आणण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचं पटोलेंनी म्हटलंय.
मुंबई बंद करण्याचा इशारा
ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास मुंबई बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय. जय भगवान टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी हा इशारा दिलाय.आरक्षणाच्या लढ्यात आता वंजारी समाजानेही उडी घेतलीय. वंजारी समाजाला दोन टक्क्यांवरून पाच टक्के आरक्षण द्यावं अशी मागणी वंजारी समाजाने केलीय.
मनोज जरांगेंचा आरोप
दरम्यान, मराठा आरक्षणाचं वाटोळं मराठा नेत्यांनीच केल्याचा मोठा आरोप जरांगेंनी केलाय. तसंच 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या नाहीतर आरक्षणविरोधी नेत्यांची नावं जाहीर करण्याचा इशाराही जरांगेंनी दिलाय. तर दिवाळीनंतर राज्यभर दौरा करणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय...
मराठा समाज आक्रमक
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला. त्यासाठी राज्यातल्या सर्वात उंच असलेल्या वजीर सुळक्यावर मराठा गिर्यारोहकांनी चढाई केलीय. पुण्याचे गिर्यारोहक ओंकार शेंडकर आणि कृष्णा मरगळे यांनी हा वजीर सुळका सर केलाय.. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये माहुली किल्ला परिसरात हा वजीर सुळका आहे. अडीचशे फूट उंच असलेला वजीर सुळका गिर्यारोहणासाठी अतिकठीण मानला जातो. 90 अंशातली सरळ उभी चढाई करताना गिर्यारोहकांच्या शारीरिक आणि मानसिकतेचा कस लागतो.. याच सुळक्यावर यशस्वी चढाई करत गिर्यारोहकांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलाय..