मुंबई : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण द्यायला राज्य मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीय. त्याशिवाय मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील राज्य सरकारच्या कृती अहवालावर देखील यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आलं. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आज सकाळी ९ वाजता पुन्हा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृती अहवालासोबतच मराठा आरक्षण विधेयक देखील सभागृहात मांडायचं का? याबाबतचा निर्णय आज सकाळच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षण विधेयकासाठी भाजपनं जोरदार हालचाली सुरू केल्यात. भाजपनं आपल्या आमदारांना व्हीप जारी केला असून, पुढचे तीन दिवस अधिवेशनात हजर राहण्याची सक्ती केलीय.


महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर काही क्षणातच शिवसेनेनंही आपल्या आमदारांना पुढचे तीन दिवस सभागृहात हजर राहण्याचा व्हीप जारी केला.


गटनेत्यांच्या बैठकीत मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधीमंडळात मांडावा, अशी ठाम भूमिका विरोधकांनी घेतलीय. त्यामुळं विधेयक मांडतांना अडचणी येऊ नये यासाठी भाजपनं शिवसेनेला सोबत घेतलंय.