पुणे  : आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही. सरकार त्यांचे काम करत राहील, मात्र मराठा तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी व्यक्त केलं आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 जणांच्या कुटुंबीयांना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांच्या हस्ते देण्यात आली. त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी धनगर समाजातील दोन आत्महत्याग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांनाही मदत करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर कोणही त्या कुटुंबाकडे पाहत नाही. आरक्षण आज किंवा उद्या मिळेल आणि विषय संपेल. परंतु, कुटुंब सावरण्यासाठी कळकळीची विनंती आहे की, टोकाचा निर्णय घेऊ नका, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं. हा लढा कशासाठी सुरू आहे ते पहा, शासन आपला निर्णय घेईल. मराठा समाज माझा असून आत्महत्या, आरक्षण हे अंतिम साध्य नाही. आत्महत्या केलेल्या 35 कुटुंबातील व्यक्तींना आधार देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये देण्यात येत आहे. 


या कुटुंबातील मुले यांचे शैक्षणिक पालकत्व आणि मुले आणि मुलींच्या लग्नापर्यंतचा खर्च आपण आजपासून उचलत असल्याचंही तानाजी सावंत यांनी सांगितलं. गेले दोन महिने आरक्षणाबाबत विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहेत. गेल्या वेळी देखील मराठा आरक्षण साठी 58 मोर्चे शांततेच्या मार्गाने काढण्यात आले. या दरम्यान 42 जणांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणे हा योग्य मार्ग नाही. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणे चुकीचे आहे. अचानक एखादे वादळ यावे तसे आरक्षण आंदोलने सुरू झाली, असल्याचे मतही सावंत यांनी व्यक्त केलं. 


मराठा समाजातील मुलांनी समाजासाठी बलिदान दिले आहे. पण समाज प्रबोधन करुन आत्महत्येचा विचार दूर करणे गरजेचं आहे. आत्महत्या हा योग्य मार्ग नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढा देण्यास शिकविलं आहे.  महाराजांची शिकवण लढण्याची आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण काम केले पाहिजे. जीवनात अनेक संकटे येत असतात. पण, त्यांना सामोरे जाताना लढणे गरजे असल्याचे समाजातील लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे असं आवाहनही तानाजी सावंत यांनी केलंय.