मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडीने पूर्तता केली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण 34 कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कुटुंबाना 10 लाख रूपये देण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात केवळ 15 कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रूपये देण्यात आले होते. मागील सरकारचं हे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल आणि या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 10 लाख रूपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिला होता. 


त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 कोटी 65 लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे. आजवर शासनाची मदत न मिळालेल्या 19 वारसांना प्रत्येकी 10 लाख तर यापूर्वी 5 लाख रूपये मिळालेल्या 15 वारसांना प्रत्येकी आणखी 5 लाख रूपये या निधीतून दिले जातील. 


शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. मराठा समाजाच्या मागणीनुसार हा निधी दिल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.