मुंबई : मराठा क्रांती मूक मोर्चासाठी हजारो मराठा बांधव मंगळवारीच मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलेत. आज सकाळी ११ वाजल्यापासून जिजामाता उद्यानाजवळून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चाद्वारे आरक्षणासाठी मराठ्यांचा एल्गार मुंबईत घुमणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोर्चासाठी मोर्चेकरांची शेकडो वाहने मंगळवारी सायंकाळीच मुंबईत दाखल झालीत. तर आज सकाळीही बाईक, कार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रं चिकटवलेली शेकडो वाहने घेऊन मुंबईत दाखल होत आहेत.



मराठा क्रांती मूक मोर्चासाठी जवळपास २० हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरवण्यात आलेत. सकाळी ७ वाजल्यापासून पोलीस कर्तव्यावर हजर राहणार आहेत. दक्षिण आणि मध्य मुंबईत विशेष बंदोबस्त तैनात आहे. मोर्चाच्या प्रत्येक मार्गावर पोलीस गस्त आहे. 



पोलीस  आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह पाचही सहआयुक्त आणि मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यातील पोलीस मोर्चा वेळी हजर असतील. पोलिसांच्या दिमतीला केंद्रीय तसेच राज्य राखीव बलाच्या १५ तुकड्या, राज्य दहशतवाद विरोधी दल, बॉम्बशोधक व नाशक पथक, शीघ्रकृती दल, फोर्सवन आणि सिव्हिल डिफेन्स तैनात ठेवण्यात आले आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून गुप्तचर तपास यंत्रणाही लक्ष ठेवून आहे.