मुंबई : मराठा समाज आरक्षणाच्या याचिकेवर आजपासून मुंबई उच्च न्यायालयात अंतीम सुनावणीला सुरुवात होणार आहे. पुढील तीन दिवस ही सुनावणी चालणार असून ८ फेब्रुवारीला न्यायालया यावर निर्णय सुनावण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. तसेच सदावर्तेंसह मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर आज एकत्रितपणे सुनावणी होणार आहे.


ऍड. मुकूल रोहतगी मांडणार राज्य सरकारची बाजू


यावेळी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्याऐवजी देशाचे माजी ऍटर्नी जनरल आणि ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आलीय. महत्त्वाच्या सुनावण्यांसाठी परदेशात जावं लागणार असल्यानं हरीश साळवे सध्या मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी उपलब्ध नाहीत. एप्रिल महिन्यानंतर ते उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे, सरकारनं सर्वोच्च न्यायालयातील तज्ज्ञ वकिलांचा शोधाशोध सुरू केला होता. अखेर मुकूल रोहतगी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. या प्ररणात रोहतगी यांना सर्वोच्च न्यायालयातील राज्य सरकारचे वकील ऍड. निशांत कातनेश्वरकर आणि ज्येष्ठ वकील परमजितसिंह पटवालिया हेदेखील मदत करणार आहेत.