मुंबई : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण विधेयकाला मंजुरी ही ऐतिहासिक घटना असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. मात्र त्याचवेळी या आरक्षणाचं श्रेय घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. आपण तयार केलेल्या अहवालात आणि ताज्या अहवालात काहीही फरक नसल्याचा दावा करत हा आपलाच विजय असल्याचंही राणे म्हणालेत.


मराठा आरक्षण जाहीर होताच जल्लोष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षण जाहीर होताच सिंधुदर्गातल्या वेंगुर्ल्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष केला. तर कणकवली आणि मालवणमध्येही जल्लोष करण्यात आला. 
 
मराठा आरक्षण जाहीर करताच पुण्यातल्या बारामती शहरातही भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला. 
 
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानं नाशिकमधल्या मनमाड शहरात मराठा समाजानं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जमून फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. मनमाडसह मालेगाव, नांदगाव, कळवण, देवळा  आणि सटाणातही जल्लोष करण्यात आला. 
 
जळगावमधील मराठा समाजानं न्यायालय चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. मराठा समाजाच्या एकजुटीचा हे फलित असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. 


सोलापुरातल्या शिवाजी चौकात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मराठा कार्यकर्त्यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. 


विधानसभेत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक सादर केल्यानंतर लातूर शहरातही मराठा समाजाने जल्लोष केला. शिवाजी चौक आणि मराठा क्रांती भवन इथे फटाके फोडून-मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
 
यवतमाळमधल्या दत्त चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. शब्द पाळणाऱ्या सरकारचा हा विजय असल्याचा दावा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केला.