मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास शब्द वापरण्यास ओबीसी संघटनांनी विरोध दर्शवलाय. हा शब्द वापरल्यानं मराठा समाजाला ओबीसींचा दर्जा प्राप्त होतो आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल अशी भीती ओबीसी समाजाला आहे. तर ओबीसींनी मराठा आरक्षण विधेयकाला विरोध करू, नये असं आवाहन मराठा संघटनांनी केलंय. यावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.


धनगर समाजाचे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजाला आरक्षण मिळालं आता धनगर समाजाचं काय असा सवाल विधानपरिषदेत विरोधकांनी केल्यानंतर लवकरच आरक्षण मिळणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. पुढील अधिवेशनात धनगर आरक्षणाचा एटीआर मांडणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसेच मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालं असलं तरी सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकेल का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र भाजपानं न्यायालयात टिकेल असं आरक्षण दिल्याचा दावा शालेय शिक्षणमंत्री आणि आरक्षणविषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे सदस्य विनोद तावडे यांनी यावेळी केला. त्यातून हे आरक्षण न्यायालयात गेलंच तर त्यासाठी वकिलांची फौज उभी करू असं आश्वासनही त्यांनी दिलंय.


मराठा समाज आंदोलकांवर गुन्हे


मराठा आरक्षण जरी मिळाले तरी अद्याप १३७०० आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत, अजूनही अटक सत्र थांबले नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नानासाहेब जावळे पाटील यांनी सांगितले. हे अटक सत्र थांबून शहीदांच्या कुटुंबीयांपैकी एकाला सरकारी नोकरी मिळावी अशी मागणी त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी या मागण्या पूर्ण करून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्याची घोषणा जावळे पाटील यांनी केली.


मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे राज्यात आनंदाचे वातावरण असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच हे आरक्षण मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी दिलेल्या लढ्यामुळे मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व मागण्यांसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करु. शिवसेना तुमच्या पाठीशी ठाम उभी असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


न्यायालयातही मराठा समाज आरक्षण टिकेल?


आरक्षण हे ऐतिहासिक असून हे आरक्षण न्यायालयातही टिकेल अशा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे. आरक्षणाचे खरे श्रेय हे आंदोलक आणि भाजप सरकारचे आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. धुळ्यात डॉ भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकत्यांनी मराठा आरक्षण मिळाल्यानंतर जलोष केला. यावेळी डॉ भामरे याना मिठाई भरवत भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.