मुंबई : मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत आहे. ४८ दिवसांपासून पावसानं दडी मारल्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली. त्याचवेळी पंचनामे वेळेवर करण्याचा सरकारला सल्ला दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे तीन वर्षांच्या दुष्टचक्रातून मराठवाड्याची सुटका झाली होती. मात्र यंदा पुन्हा दुष्काळाच्या दुष्टचक्रात मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ अडकण्याची चिन्ह दिसत आहेत.  राज्यातल्या १०४ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ ते १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालाय. काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवल्यामुळं खरीपाचा हंगाम बळीराजाच्या हातातून गेल्याचं स्पष्ट झालंय. 


सर्वात आधी झी २४ तासनं मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त गावांमध्ये जाऊन वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. कापूस, मका आणि खरीपातली इतर कडधान्याची पीक जवळपास हातातून गेली आहेत. आता पावसानं हजेरी लावली तरी पिण्याची पाण्याचा प्रश्न सुटू शकते मात्र त्याचा खरीपाच्या पिकांना कोणताही लाभ होणार नाही. जसजशी पीक करपू लागली आहेत..तसतसे दुष्काळाचे संकेत मिळत आहेत. 


मराठवाड्यात आतापर्यंत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून ऑगस्ट मध्ये केवळ पाच टक्केच पाऊस झाल्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून योग्य ती काळजी घेतली जात असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील, अशी ग्वाही कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानपरिषदेत दिली .
   
सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा , शेतमालाचे पडलेले भाव आणि दुष्काळाच्या छायेमुळे मराठवाड्यातले शेतकरी हवालदिल झाले आहेत यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती , या चर्चेला उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की , अत्यल्प पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकाऱ्यांना भरपाई दिली जाईल . 


मराठवाड्यातल्या शेतकाऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन स्तरावर पावलं उचलली जात आहेत.  यंदा सुमारे ६०लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरल्याचं त्यांनी सांगितलं.