विक्रोळी, चेंबूर दुर्घटनेवर महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
रविवारची सकाळ मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक
मुंबई : रविवारी सकाळी विक्रोळी आणि चेंबूरमध्ये भिंत कोसळल्याने तब्बल 24 जणांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे. डोंगराळ भागात दुर्घटना घडल्यामुळे बचावकार्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. विक्रोळी चेंबूर दुर्घटनेवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाले सफाईचं काम वेगात सुरू आहे. पंपिंग स्टेशन देखील वेगाने पाणी बाहेर फेकण्याचं काम करत आहे. असं पेडणेकर म्हणाल्या
'तो निसर्ग आहे, निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. जेव्हा वेधशाळेचा अंदाज येतो, तेव्हा धोकादायक भागातील नागरिकांना नोटीस दिल्या जातात, त्यांना बाहेर देखील काढण्यात येत, पण विरोध होतो, आजच्या घडीला घर अत्यंत महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा जास्त जीव महत्त्वाचा असतो. '
चेंबूर दुर्घटनेप्रकरणी प्रभाग अधिकारी आणि पेडणेकर यांची फोनवरून चर्चा झाली. प्रभाग अधिकाऱ्यांनी रहिवाशांना तीनवेळा जाऊन समजावलं होतं. भिंत, भिंतीला लागून असलेला डोंगर आणि झाडं... त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुंटुंबाची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. असं देखील पेडणेकर म्हणाल्या.
त्यानंतर किशोरी पेडणेकर यांना तुम्ही घटनास्थळी जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला, यावर त्या म्हणाल्या, 'माझी प्रकृती आज स्थिर नाही. त्यामुळे मी आधी डॉक्टरांकडे जाईल आणि डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर मी घटनास्थळी दाखल होईल..'
विक्रोळी, चेंबूरमध्ये भिंत कोसळ्यामुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अद्यापही शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. विक्रोळी सुर्यनगर परिसरामध्ये तीन ते चार घरांवर दरड कोसळली आहे तर पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे.