राहुल गांधींना मुंबई कोर्टाचा समन्स, कोर्टात हजर राहण्याचे आदेश
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींना मुंबईतील कोर्टाने समन्स जारी केलं आहे.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधींना मुंबईतील कोर्टाने समन्स जारी केलं आहे. राहुल गांधी यांना येत्या १५ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. राफेलप्रकरणी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनी मोदींना कमांडर इन थिफ असं संबोधत ट्विट केलं होतं. याप्रकरणी भाजप नेते महेश श्रीश्रीमल यांनी कोर्टात राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आक्षेपार्ह टीका राहुल गांधी यांनी केली होती. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि पक्षाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली भाजप कार्यकर्त्याने याचिका दाखल केली होती. या प्रकरणात माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत आरोपांना उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
राहुल गांधी यांनी केवळ पंतप्रधानांची नव्हे तर पक्षाच्या सदस्यांचीही बदनामी केल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी केला आहे. कलम ४९९ आणि ५०० अन्वय असलेल्या आरोपांविषयी न्यायालयाने राहुल यांच्याकडे उत्तर मागितलं आहे.