मुंबई :  मुंबईत गोवरच्या साथीचा उद्रेक झालाय. 109 बालकांना गोवरची लागण झाली असून यातल्या 50 लहान मुलांना कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, त्याला  व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलंय. शहरातील पाच वॉर्डांमध्ये, विशेषतः एम-पूर्व विभागात गोवरचे रुग्ण आढळल्यानंतर आता पालिकेकडून विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलीय. तर, आता राज्याचा इतर भागांमध्येही गोवरची साथ पसरलीय. भिवंडी, मालेगावातही रुग्णांची संख्या वाढत असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीवरून स्पष्ट होतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवरची लक्षणं कोणती?
गोवर हा वेगानं पसरणारा आजार असून तो पॅरामिक्सो व्हायरसमुळे होतो. सगळ्यात आधी हा विषाणू श्वसनमार्गाला संक्रमित करतो. अंगावर लाल पुरळ किंवा लाल रंगाचे रॅशेस येणं या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. सुरुवातीला मुलांना खोकला आणि सर्दी ही लक्षणं दिसतात. तसंच डोळे लाल होऊ शकतात. बालकांमध्ये अशक्तपणा जाणवतो. यापैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांकडे जा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलंय. 



गेल्या वर्षभरात राज्यात गोवरच्या तब्बल साडे चार हजार संशयित रूग्णांची नोंद झालीय. गोवरचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं विशेष लसीकरण मोहीम सुरू केलीय. 9 ते 16 महिन्यांच्या बालकांना गोवर प्रतिबंधक लस दिली जाते. त्यामुळे तुमच्या घरातील लहान मुलांमध्ये गोवरची लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष करू नका.