मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी भार्गवी दुपारे हिचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. भार्गवी पेरामेडिकलच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. येत्या १८ जूनला तिची परीक्षा होती. मात्र १३ तारखेच्या रात्री २ वाजता तिच्या पोटात दुखू लागल्याने नातेवाईकांनी तिला सपना हेल्थ केअरमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर वडिलांशी तिची फोनवरुन संवाद झाला. मात्र सकाळी इंजेक्शन दिल्यानंतर भार्गवीची तब्येत बिघडली आणि दुपारी तिचा मृत्यू झाला. चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच भार्गवीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे वडिल नरेंद्र दुपारे यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारी भार्गवी नरेश दुपारे हिच्यावर चुकीचे औषधोपचार केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप भार्गवीच्या वडिलांनी केला आहे. उपचार सुरू असताना आपण व्यवस्थित असल्याचे तिने आपल्या वडिलांना फोनवरून सांगितले होते. मात्र अचानकपणे सकाळी नऊ वाजता कोणते तरी इंजेक्शन दिले आणि भार्गवीची तब्येत बिघडली. तिला अस्वस्थ वाटू लागले. तिचा चेहरा सुजू लागला आणि म्हणून तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना कळवले. या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांचा हलगर्जीपणा असून चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच भार्गवीचा मृत्यू झाला, असा आरोप भार्गवीच्या वडिलांनी केला आहे.


भार्गवीचा मृतदेह श्वविच्छेदनाकरिता राजावाडी येथे आणला आहे. मात्र जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका तिच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. या मृत्यूबाबत 'झी 24 तास'ने सपना हेल्थ केअरशी संपर्क केला असता डॉक्टरांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. दरम्यान, श्वविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.