रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या वेळा
Sunday Megablock: रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि रेल्वे प्रवासावर अवलंबून असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि रेल्वे प्रवासावर अवलंबून असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 10 मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळा आधीच जाणून घेतलात तर ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही.
विद्याविहार आणि ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सुटणाऱ्या/येणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान अनुक्रमे डाऊन आणि अप जलद मार्गांवर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिराने चालतील.
मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.18 ते दुपारी 3.28 पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.37 ते दुपारी 3.45 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.
डाऊन हार्बर लाईनवर पनवेलसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 वाजता सुटेल. वाशीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.18 वाजता सुटेल. पनवेलसाठी ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.36 वाजता सुटणार आहे.
अप हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.33 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल वाशी येथून दुपारी 4.19 वाजता सुटणार आहे.ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी 4.10 वाजता सुटणार आहे.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-मानखुर्द सेक्शनवर विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 या कालावधीत ट्रान्स हार्बर/मुख्य मार्गांवर प्रवास करण्याची परवानगी असेल याची माहिती देण्यात आली आहे.