मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
१४० टन क्रेनद्वारे हे गर्डर बसवण्यात येणार असल्याने हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईत रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मशीद स्थानकात पुलाचे तीन गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. १४० टन क्रेनद्वारे हे गर्डर बसवण्यात येणार असल्याने हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात हा पूल पाडण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. आजचे हे गर्डर टाकण्याचे काम देखील विक्रमी वेळत होणार आहे. पण एलफिस्टन पूलाप्रमाणे लष्करी मदत मिळणार नसून मध्य रेल्वे तर्फेच हे काम होणार आहे.
लष्करी पुलाचे अनुकरण ?
एलफिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर कमीत कमी वेळेतही भक्कम पूल कसा बांधता येऊ शकतो याचा पायंडा लष्कराने पाडून दिला. अर्थात यामध्ये जवानांची मेहनत, यंत्रणा होतीच. याचे अनुकरण पुढच्या काही दिवसात रेल्वे किंवा प्रशासनाकडून होताना दिसल्यास वावग वाटणार नाही. ज्या ठिकाणी एखादा ब्रीज बांधण्यास अनेक दिवस जायचे त्यात प्रवाशांचा खोळंबा व्हायचा. तसेच बांधलेल्या पुलावरही डागडूजीची वेळ येते. त्या तुलनेत जर लष्करी पुल बांधणीचे अनुकरण होणार असेल तर ते सकारात्मक असेल. याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांकडून अधिक स्पष्टीकरण आजच्या दिवसात येऊ शकते.
दोन्ही मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते भायखळा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाउन ब्लॉक दरम्यान मशीद बंदर आणि सॅण्डहस्ट रोड स्थानकात लोकल थांबणार नाहीत.
दर 15 मिनिटांनी लोकल
सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यानची अप-डाउन मार्गावरील लोकल वाहतूक बंद असणार आहे. भायखळा ते सीएसएमटी दरम्यानची अप-डाउन धिम्या मार्गावरील वाहतुक जलद मार्गावरुन वळविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी वडाळा रोडहुन पनवेल अणि बांद्रा-गोरेगावसाठी दर १५ मिनिटांनी लोकल चालविण्यात येणार आहे.