मुंबई : काँग्रेस राष्ट्रवादीकडून आम्हाला निरोप येतो आहे पण आम्ही मोदींसोबत राहणार आहोत असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आरपीआयच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार आहोत असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. आम्हाला अनुल्लेखाने मारू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई यामधली एक लोकसभा जागा मिळावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. त्यासोबत लातूर, रामटेक, सोलापूर यापैकी एका जागेची मागणी त्यांनी केली आहे. साताऱ्याची जागा नको असं असल्याचं देखील आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी म्हटलं की, शिवसेना-भाजप युतीसाठी मी देखील प्रयत्न करत होतो. पण तुम्ही एकत्र येऊन आरपीआयला एकही जागा सोडू नरा असं मी म्हटलं नव्हतं. माझे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध आहेत. याचा अर्थ आम्हाला वाऱ्यावर सोडा असा होत नाही. युती झाली तेव्हा आम्हाला चर्चेत सहभागी करून घ्यायला हवं होतं. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


दक्षिण मध्य मुंबई नसेल तर ईशान्य मुंबई लोकसभेची जागा द्या. तसंच विधानसभेसाठी किमान ८-१० जागा आरपीएयला सोडायला हव्या, अशी मागणी रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली होती. गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही भेटणार असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.