कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे :  म्हाडा (Mhada) परीक्षेमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी संबंधित कंपनीच कंत्राट रद्द करुन, रद्द केलेली परीक्षा TCS या संस्थेमार्फत घेणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. परीक्षेत पारदर्शकता आणि प्रामाणिक, हुशार, गरीब घरांतून आलेल्या मुलांचे हक्क डावलले जाऊ नये हाच उद्देश असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

TCS सारख्या विश्वविख्यात आणि इतिहासात कधीच चुका केल्या नसलेल्या संस्थेमार्फत आम्ही येणारी परीक्षा घेणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. तसंच गुन्हेगार प्रवृत्तीचे जे विद्यार्थी असतील जे कोणाला हाताशी धरुन जर जागा हिसकावून घेत असतील ते थांबवणं आमचं कर्तव्य आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. 


या माध्यमातून ज्यांनी आपल्याला नोकरी मिळेल या इच्छेपोटी पैसे दिलेत त्यांना आम्ही गुन्हेगार ठरवणार नाही. त्यात विद्यार्थ्यांची काहीही चुक नाही पण तुम्ही जर दलालांना पैसे दिले असतील तर त्या दलालांची नाव आम्हाला कळवा त्यांना धडा शिकविण्याची जवाबदारी आम्ही घेतो असंही आव्हाड म्हणाले आहेत. 


गेली पाच सात वर्षे ज्या एजन्सीज यासाठी किंवा सरकारी नोकर भरती परिक्षेसंदर्भात काम करत आहेत त्यांच्याकडून सर्व कामे काढुन TCS किंवा IBPS सारख्या संस्थेला हि काम देण्यात यावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं आहे. 


सरकारवर परीक्षा रद्द कण्याची नामुष्की
आरोग्य विभाग भरती परीक्षाच्या पेपर फुटीचं प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हा गैरप्रकार उघडकीस आणला असून या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 


यानंतर गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन ही परीक्षा रद्द करण्यात असल्याची माहिती दिली. पण परीक्षा अचानक रद्द झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत.


दरम्यान, म्हाडाच्या परीक्षा रद्द झाल्याने आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविप कार्यकर्त्यानी निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त तैनात केल्याने कार्यकर्ते घराजवळ पोहचू शकले नाही. मात्र निदर्शने आणि घोषणाबाजी सुरू असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी त्याठिकाणी आल्यानं मोठा तणाव निर्माण झाला होता.