म्हाडाच्या २१७ घरांसाठी आज सोडत
ही अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरे आहेत.
मुंबई: मुंबईसारख्या शहरात सामान्य लोकांना रास्त दरात हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'म्हाडा'कडून रविवारी मुंबईतील २१७ घरांसाठीची सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या वेबसाईटवरून http://mhada.ucast.in केले जाणार आहे. ुंबई म्हाडाच्या २१७ सदनिकांसाठी आज सोडत काढण्यात येणार आहे. मुंबई म्हाडाच्या वांद्रे इथल्या कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी १० वाजता या अर्जाची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. यंदाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटाकरिता सहकार नगर, चेंबूर येथील १७० सदनिका व मध्यम उत्पन्न गटाकरिता ४७ सदनिकांचा समावेश आहे. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून वेबकास्टिंगद्वारे या सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
सोडतीसाठी मोठा सभामंडप उभारण्यात आला असून, त्याची आसनक्षमता १,२०० इतकी आहे. मंडपात तीन मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. सोडतीला गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, सभापती मधू चव्हाण उपस्थित असतील.
गेल्यावर्षी सात मार्चपासून मुंबई मंडळाच्या या २१७ घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील या घरांसाठी अनामत रकमेतही कपात करण्यात आली होती. एकाच अनामत रकमेत अनेक घरांसाठी अर्ज करण्याच्या सुविधेमुळे सामान्य लोकांना फायदा झाला होता.