`म्हाडा` लॉटरीमधली ती तीन महागडी घरं कुणाला मिळणार?
१० डिसेंबर २०१८ पर्यंत या सदनिकांसाठी अर्जदार अर्ज दाखल करू शकतात
मुंबई : म्हाडानं मुंबईच्या यंदाच्या लॉटरीत उपलब्ध करुन दिलेल्या ५ कोटींच्या तीन महागड्या घरांना चांगला प्रतिसाद मिळतोय. ग्रँटरोडच्या धवलगिरीतील उच्च गटात मोडणाऱ्या या घरांसाठी आतापर्यंत १३० अर्ज आलेत. ग्रँट रोड भागातील कंबाला हिल इथं ही इमारत आहे. या घराची किंमत आहे ५ कोटी ८० लाख रुपये... या इमारतीमधील ३ घरं म्हाडाच्या लॉटरीत समाविष्ट करण्यात आलीत. या घरांचं क्षेत्रफळ ९८५ चौरस फूट इतकं आहे. उच्च गटात मोडणाऱ्या ३ घरांसाठी ऑनलाइन अर्जाबरोबर तब्बल ७५ हजार ३३६ रुपये अनामत रक्कम भरावयाची आहे. ही रक्कम १३० पैकी ३९ जणांनी भरुन ऑनलाइन नोंदणीही पूर्ण केलीय. ही घरं कोणाच्या नशिबात येणार याचा निकाल १६ डिसेंबरला लागणार आहे.
यंदाच्या लॉटरीत उच्च उत्पन्न गटासाठी १९४ सदनिका उपलब्ध आहेत. १० डिसेंबर २०१८ पर्यंत या सदनिकांसाठी अर्जदार अर्ज दाखल करू शकतात.
घरांसाठी उत्पन्नाची मर्यादा
- अत्यल्प प्रवर्ग उत्पन्न (EWS) - २५०००
- अल्प उत्पन्न (LIG) - २५ ते ५० हजार
- मध्यम उत्पन्न (MIG) - ५० ते ७५ हजार प्रति महिना
- उच्च उत्पन्न गट (HIG) - ७५,००१ किंवा त्यापेक्षा जास्त