Maharashtra News in Marathi: म्हाडाच्या (MADHA) मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी सोडत काढण्यात आली आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (YB Center) ही सोडत जाहीर करण्यात आली होती. एक लाख 20 हजार 144 अर्जदारांनी या घरांसाठी अर्ज केला होता. त्यातील 4 हजार 82 जणांना या घरांची लॉटरी लागली आहे. मात्र आता विजेत्यांनी किमती परवड नसल्याने घरे परत करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आमदारांचा देखील समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची सोडतीसाठीची उत्पन्न मर्यादा आणि प्रत्यक्ष किमती यात प्रचंड तफावत असल्याने ही घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आता ही घरे आमदारांनाही परवडत नसल्याचे समोर आलं आहे. बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनाही ताडदेवमधील साडेसात कोटींची दोन घरे लागली होती. मात्र परवडत नसल्याने त्यांनी दोन्ही घरे परत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीत  असलेल्या केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना हे घर मिळण्याची संधी आहे.


मुंबई मंडळाच्या म्हाडाच्या घरांसाठी आरक्षित प्रवर्गातून काही लोकप्रतिनिधींनी अर्ज केले होते. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, आमदार नारायण कुचे यांच्यासह अनेकांनी या सोडतीमध्ये सहभाग घेतला होता. नारायण कुचे आणि भागवत कराड यांनी ताडदेवमधील क्रिसेन्ट टॉवरमधील साडेसात कोटींच्या घरासाठी अर्ज केला होता. सोडतीत नारायण कुचे हे या घरासाठी विजेते ठरले. तसेच साडेसात कोटींच्या दुसऱ्या घरासाठी देखील अनुसूचित जाती प्रवर्गातून कुचे विजेते ठरले होते. त्यानंतर आता म्हाडाची घरे महाग असून ती सर्वसामान्यांना परवडत नसल्याचे सांगून आपण ताडदेवमधील दोन्ही घरे गुरुवारी परत केल्याची माहिती कुचे यांनी दिली आहे.


"सोडतीत विजेता ठरल्यानंतर गृहकर्ज आणि रकमेची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. पण, मी इतकी मोठी रक्कम जमवू शकत नाही, आपल्याला तितके गृहकर्ज मिळणार नाही, याची खात्री झाली. त्यामुळे दोन्ही घरे परत केली," अशी प्रतिक्रिया नारायण कुचे यांनी लोकसत्तासोबत बोलताना दिली.


म्हाडाच्या सोडतीनंतर मंडळाने विजेत्यांना ऑनलाइन स्वीकृती पत्र पाठवले आहे. त्यामुळे विजेत्यांना घर हवे आहे की नाही हे 27 ऑगस्टपर्यंत मंडळाला कळवायचे आहे. मात्र त्याआधीच नारायण कुचे यांनी दोन्ही घरे परत केली आहेत. कुचे यांनी घरे परत केल्यामुळे प्रतिक्षा यादीत असलेल्या भागवत कराड यांना हे घर मिळण्याची शक्यता आहे.