Mhada Homes : किमान दरात कमाल गैरसोयी? म्हाडाच्या घरांना गळती; बांधकामावर प्रश्नचिन्हं
Mhada Lottery News : म्हाडाच्या सोडतीमध्ये विजयी झालेल्यांपुढं नवी अडचण... भर पावसाळ्यात घरांना गळती... आता करायचं काय? रहिवाशांपुढे प्रश्न
Mhada Lottery News : मुंबईत (Mumbai News) हक्काचं घर हवं अशी अनेकांचीच इच्छा असते. या हक्काच्या घरासाठी जीवाचा आटापिटा करून, पोटाला चिमटा काढून पैसे साठवले जातात. पण, घराचं स्वप्न मात्र साकार केलं जातं. अशा या स्वप्नपूर्तीमध्ये म्हाडा म्हणजे अनेकांचाच मोठा आधार. खिशाला परवडणाऱ्या आणि कुटुंबाला सामावून घेणाऱ्या घराच्या शोधात असणाऱ्या अनेकांचा शोध म्हाडापर्यंत येऊन थांबतो. सध्या मात्र याच स्वप्नांच्या घरांमध्ये अडचणी निर्माण Mhada Lottery मध्ये विजयी ठरलेल्या अनेकांनाच पावसाळ्यामध्ये घरातील भींतींमधून पाझरणाऱ्या पाण्यामुळं अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्वस्तात मस्त घरं मिळवून देणाऱ्या म्हाडाच्या घरांसंदर्भातील या वृत्तामुळं आता अनेक स्तरांतून या इमारतींच्या बांधकामावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. मुंबईच्या विक्रोळीतील कन्नमवार नगर इथं असणाऱ्या म्हाडाच्या घरांना गळती लागली आहे. त्यामुळं रहिवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. पहिल्याच पावसाच घरांना लागलेली गळती, इमारतीच्या बांधकामातील त्रुटी अशा समस्या समोर येऊ लागल्यामुळं सोडतीत विजयी झालेली मंडळी हैराण झाली आहेत.
हेसुद्धा वाचा : उपग्रहाचा महाभयंकर स्फोट आणि क्षणात चिंधड्या; अंतराळातील या घटनेनं वाढवली जगाची चिंता
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हाडाच्या घरांमध्ये होणाऱ्या या गळतीसंदर्भात वक्तव्य करताना '22 टक्के म्हाडाच्या इमारतीमध्ये मिळणार तर, ही इमारत गळणार नाही तर काय होईल? गळतीच इतकी लागली... पैसे खाण्यासाठी तर तो (बिल्डर) काय काम करेल?' असा प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केला.
किमान दरात कमाल गैरसोयी?
म्हाडाच्या विक्रोळीतील प्रकल्पांमध्ये सोडतीच्या माध्यमातून साधारण 40 लाखांच्या किमतीत सामान्यांना घरं उपलब्ध करून देण्यात आली. घरांचे दर कमी असले तरीही इथं वास्तव्यास आल्यानंतर मात्र रहिवाशांना पाणी न येणं, पार्किंगची अडचण, लिफ्टची अडचण आणि आता पावसाळ्यात होणारी गळती अशा समस्यांना सामोरं जावं लागत आहे. घरासाठी कर्ज काढलं, पण, इथं येऊन मात्र त्रास आणि अडचणींमध्ये भरच पडली अशीच उद्विग्न प्रतिक्रिया सदर इमारतींमधील रहिवासी देत आहेत. काही रहिवाशांनी येथील बांधकामावर प्रश्नचिन्हं उपस्थित करत आताच ही परिस्थिती आहे, तर पुढे काय? असा सवाल करत म्हाडा प्रशासनाकडे आपल्या अडचणींसंदर्भातील प्रश्न मांडले.