मुंबई : म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आज प्रतिक्षा संपली. म्हाडाच्या मुंबईतील २१७ घरांसाठी आज रविवारी सोडत काढण्यात आली. या सोडतील राशी कांबळे या पहिल्या विजेत्या ठरल्यात. २१७ घरांसाठी जवळपास ६६ हजार अर्ज आले होते. यंदाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी चेंबूरमधील सहकार नगरमधील १७०, तर मध्यम उत्पन्न गटासाठी ४७ घरांचा समावेश होता. आज सकाळी १० वाजता सोडत काढण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडा घराचे दुसरे विजेते दीनानाथ नवगिरे हे ठरले आहेत. सोडतीला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, सभापती मधू चव्हाण उपस्थित होते.


म्हाडा सोडतीमधील यशस्वी आणि प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची नावे http://lottery.mhada.gov.in आणि http://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली आहेत. 



मुंबई मंडळातर्फे विविध गृहप्रकल्पांमधल्या २१७ सदनिकांच्या विक्रीसाठी ६ मार्चला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. १३ एप्रिल २०१९ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू आचारसंहितेमुळे या वेळापत्रकात बदल करुन २४ मे २०१९ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती.