कोरोनाचे संकट । एमआयडीसीकडून ११ कोटींची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली.
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (कोवीड-१९) एकूण ११ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्त केला आहे. तसेच सोलापूर येथील प्रिसीजन कंपनीकडून एक कोटी रुपयांची मदत कोरोनाविरुध्दच्या लढ्यासाठी देण्यात आली आहे. तर सीडीएसएल ग्रुपने ६.८२ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्य निधीला मदत म्हणून दिलेत.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वप्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून विविध सेवाभावी संस्था, उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख व धार्मिक संस्था आदींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आव्हानास प्रतिसाद देत अनेक संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत केली आहे.
याच अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील एप्रिल महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनाचे एकूण ४५.७७ लाख रुपये आणि उर्वरित रक्कम महामंडळाने जमा केली असून एकूण ११ कोटींचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे.
'कोरोना संकटाच्या काळात जमेल त्या पद्धतीने जनतेच्या मदतीस धावून जा' असा सूचनावजा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना दिला आहे, असे सांगत त्यातूनच प्रेरणा घेऊन आपण मदत करत आहे. माजी आमदार नितीन सरदेसाई आणि सरदेसाई कुटुंबीयांनी १० लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला.