मुंबई : आजपासून दूध उत्पादकांना लिटरमागे २५ रुपयांचा दर मिळणार आहे. दूध दरवाढीसाठी दूध उत्पादकांनी आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनानंतर सरकारने दुधाचे दर लिटरमागे २५ रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. आजपासून या घोषणेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर नागपूर पावसाळी अधिवेशनात २१ जुलैपासून अंमलबजावणीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र खासगी तसंच शासनाच्या दूध सहकारी संस्थांनी तांत्रिक कारणामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.


गेल्या महिन्यात राज्यभरात दूध आंदोलन पेटलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात 19 जुलै रोजी दुधाला 25 रुपये प्रति लिटरचा दर जाहीर केला होता. पण काही मोजके दूध संघ वगळता इतर सहकारी, खासगी दूध संघांकडून नव्या दराची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. यानंतर संघांनी एक ऑगस्टपासून शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रति लिटर 25 रुपये दर देण्याची तयारी दर्शविली. 


पिशवीबंद दुधासाठी कोणतेही अनुदान मिळणार नाही. पिशवीबंद दूध वगळून उर्वरित दुधासाठी राज्य सरकारकडून पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. लोणी वगळता दूध भुकटी आणि इतर दुग्ध उत्पादने यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. जे दूध भुकटी उत्पादक पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे अनुदानाचा लाभ घेतील त्यांना भुकटी निर्यातीसाठीचे अनुदान दिले जाणार नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.