दूध दर आंदोलन: आतापर्यंतच्या ठळक घडामोडी
काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. आंदोलनाची विविध ठिकाणी असलेली स्थिती जाणून घेण्यासाठी पाहा हे ठळक मुद्दे...
मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या दूध दरवाढ आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पहायला मिळत आहेत. शासन दरबारीही या आंदोलनाची नोंद घेतली गेली असून, सरकार या आंदोलनावर बारीक नजर ठेऊन आहे. दरम्यान, आंदोलकांनी अनेक ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतला असून, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. आंदोलनाची विविध ठिकाणी असलेली स्थिती जाणून घेण्यासाठी पाहा हे ठळक मुद्दे...
राजू शेट्टींकडून सरकारला इशारा; आंदोलकांना अवाहन
शेतकऱ्यांनी दूध आंदोलन शांततेच्या मार्गानं करावं. दुधाची नासाडी करु नये, असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांना केले आहे. पण, हे अवाहन करतानाच, दूधाला भाव दिला नाही तर, आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. दूधाला लीटरमागे पाच रुपये दरवाढ मिळावी अन्यथा आंदोलोन सुरुर रहाणार असल्याचं ते म्हणाले. नामदेव पायरीवर प्रतिकात्मक विठ्ठल रुख्मिमी मुर्तीला दुग्धाभिषेक घालत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्थांचा आंदोलनाला पाठींबा
दरम्यान, सांगलीमध्ये समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पग्रस्थांनी दूध दरवाढीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. मिरज पूर्व भागातील १०० दूध डेयरी मालक, दूध संकलन केंद्राचे मालक, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. दूधाचा दर वाढवून मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुरच राहील अशा इशाराही प्रकल्पग्रस्थांनी दिला आहे.
दूध दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलय. अमरावतीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवून दिला. हा टँकर नागपूरला दूध नेत होता. दूध दरात पाच रुपयांची वाढ करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकर संघटनेनं लावून धरलीय. त्यासाढी १६ जुलैपासून शहरांचा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.
जालन्यातही आंदोलन
दूध दरवाढीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं जालन्यातही आंदोलनाला सुरुवात केलीये. जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतून हे आंदोलन केलं. संध्याकाळी करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी दूध संकलन केंद्रावर दुधाच्या विक्रीसाठी जाणाऱ्या गाड्या रोखून धरल्या. तसेच गाड्यामधून विक्रीसाठी जाणारं दूध रस्त्यावर ओतून सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध केला.
जलसंपदा मंत्र्यांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला इशारा
दुधाच्या दराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील याबाबत अनुकूल आहेत. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आपली भूमिका सोडायला तयार नाहीत. दूध दराबाबतचं आंदोलन हिंसक होऊ नये याबाबतची काळजी नेत्यांनी घ्यावी. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ देऊ नये. तसं केलं तर कारवाई अटळ असून, सरकार हातावर हात धरून बसणार नाही असा सज्जड दम जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राजू शेट्टी यांना भरलाय.
पोलिसांनी माकड चेष्टा थांबवावी - राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध आंदोलनादरम्यान पोलीस आमच्या कार्यकत्याना त्रास देत आहेत. पोलिसांनी माकड चेष्टा थांबवावी. शेतकरी चिडला तर मग तो कोणाचं ऐकणार नाही. कितीही पोलीस फोर्स आणि पॅरा मिलटरीफोर्स लावा आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टीं यांनी दिला आहे. इतर राज्यांतून दूध आणून आमचे आंदोलन मोडिस काडण्याची भाषा कोणी करु नये, असंही ते म्हणाले. सांगली येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.