मुंबई : गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारे नेतृत्व कामगार नेते दत्ता इस्वलकर ( Datta Iswalkar) यांचे काल मुंबईत दिर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांनी गिरणी कामगारांसाठी मोठा लढा दिला होता. कामगारांचे प्रश्न सातत्याने लावून धरले होते. गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. (datta iswalkar leader of mill workers in mumbai passed away)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिरणी कामगारांचा संप असो की, गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावी यासाठी लढा देण्यासाठी दत्ता इस्वलकर हे नेहमी पुढे असायचे. त्यांच्या जाण्याने विस्थापित झालेल्या गिरणी कामगारांचा हक्काचा माणूस हरपल्याची भावना गिरणी कामगारांमध्ये पसरली आहे.  


 वरळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार  


दत्ता इस्वलकर हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. काल सकाळी त्यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव गोठल्यानंतर त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काल संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील मॉडर्न मिलमध्ये दत्ता इस्वलकर यांचे वडील नोकरीला होते. 1970 साली वयाच्या 23 व्या वर्षी दत्ता इस्वलकर हे मॉडर्न मिलमध्ये नोकरला लागले. राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतील अनेक संस्था संघटनांशी निकटचा संबंध असलेले दत्ता इस्वलकर यांनी 1987 नंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यास प्राधान्य दिले होते. रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते.


ज्येष्ठ कामगार नेते दत्ता सामंत यांनी 1982 साली गिरणी कामगारांचा मोठा संप केल्यानंतर सुमारे अडीच लाख कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य अंधारात आले. गिरणी कामगारांना देशोधडीला लावण्यात अनेक राजकीय पक्षसंघटनांचा हातभार होता याची जाण इस्वलकर यांना होती. स्वान मिल, मॉडर्न, रघुवंशी, कमला, मुकेश, श्रीनिवास, ब्रडबरी अशा दहा मिल बंद झाल्यानंतर गिरणी कामगारांना कोणी वालीच उरला नव्हता. अशा कठीण काळात 2 ऑक्टोंबर 1989 साली दत्ता इस्वलकर आणि त्यांच्या सहकार्यांनी बंद गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली. त्या समितीचे दत्ता इस्वलकर हे निमंत्रक होते. तेथून त्यांनी संर्घषाचा लढा सुरु केला.