OBC बाबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाने केली राजीनाम्याची मागणी
जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ओबीसी (OBC) समाजाबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वक्तव्याविरोधात भाजप (BJP)आक्रमक झालं असून जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. एका कार्यक्रमातील आव्हाड यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध असं या व्हिडिओसोबत लिहिण्यात आलं आहे.
व्हिडिओत नेमकं काय म्हटलेत आव्हाड
'ओबीसींवर माझा फार काही विश्वास नाही, कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं'.
ओबीसींवर ब्राम्हणवादाचा पगडा
OBC वर ब्राम्हणवादाचा इतका पगडा बसला आहे, आपण श्रेष्ठ आहोत, पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळं विसरले. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येत आहेत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअॅप करुन चालणार नाही रस्त्यावर यावं लागेल. असं या व्हिडिओत बोलताना आव्हाड दिसत आहेत.
भाजपाने केली राजीनाम्याची मागणी
जितेंद्र आव्हाड यांचं ओबीसी समाजाबद्दलचं वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे, ते जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारं आहे. त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, नाही तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
माफी मागितली नाही तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल आणि कायदा सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर जितेंद्र आव्हड जबाबदार राहतील, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. अशा जातीयवादी व्यक्तीला कॅबिनेट मंत्री म्हणून ठेवू नये, जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.