कृष्णात पाटील, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : विलेपार्ल्यातल्या लोकमान्य सेवा संघाच्या वतीनं टिळक मंदिर इथं ठेवण्यात आलेल्या मिसळोत्सवाला मुंबईकरांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कडधान्यांच्या रस्सेदार उसळीत टाकलेला फरसाण आणि त्यावर लालभडक तर्रीचा तवंग....कांदा-कोथिंबीर टाकलेली तिखटजाळ मिसळ पाहिल्यावरच जीभेला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच अशा मिसळीची चव चाखण्यासाठी विलेपार्लेतील मिसळोत्सवात पाय ठेवायला जागा नाही, इतकी गर्दी खवय्यांनी केली. प्रचंड गर्दीमुळे एकेक तास रांगेत उभे राहावं लागत असल्यानं प्रत्येकाला मिसळीवर ताव मारण्यासाठी खूपच संयम पाळावा लागतोय.


या मिसळोत्सवात एकाच ठिकाणी कोल्हापूर, नाशिक, संगमेश्वर, पुणे, पेण, लोणावळ्यातील प्रसिद्ध मिसळचे स्टॉल लागलेत. त्यामुळे मुंबईकर विविध शहरातून आलेल्या मिसळवर ताव मारण्यात गुंग झाले होते. काहीजण सहकुटुंब आले होते तर तरुणाई ग्रूपने मिसळ खाण्यासाठी आले होते.


मिसळप्रेमींनी आयोजकांचा अंदाज साफ चुकवून टाकला. इतका प्रतिसाद या मिसळोत्सवाला मिळाला. झणझणीत तर्रीबाज मिसळ तोंडाचा जाळ काढत असली तरी ती चविष्ट, लज्जतदार असल्याने कुणी खायचं सोडत नव्हते.


तिखटपणा सहन न करणारे अनेकजण तिखटपणावर उतारा म्हणून कुल्फीचा सहारा घेत होते. रविवार हा या मिसळोत्सवाचा शेवटचा दिवस. त्यामुळे ज्यांना मिसळ चाखायची आहे त्यांनी या महोत्सवाला आवर्जुन हजेरी लावायच हवी.