मुंबई : मुंबईत लवकरच परदेशातील 'सिॲम ओशन वर्ल्ड'च्या धर्तीवर जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभं राहण्याची शक्यता आहे. यासंबंधी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक बैठक नुकतीच पार पडली. विशेष म्हणजे, या बैठकीला उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या बैठकीबद्दल माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयाकडून ट्विटद्वारे माहिती देण्यात आली. या फोटोंमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाजुच्या खुर्चीवर आदित्य ठाकरेही दिसत आहेत. त्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलंय. सचिवस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरेंची अनेकदा उपस्थित या वादाचा मुख्य विषय आहे.  


पर्यटन विभागाच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत आदित्य ठाकरेंची उपस्थिती

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्यादृष्टीने बँकॉक इथल्या 'सिॲम ओशन वर्ल्ड'च्या धर्तीवर मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पर्यटन विभागाला दिल्या, असं माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (DGIPR) कार्यालयाकडून ट्विट करण्यात आलंय.


मुख्यमंत्र्यांसोबत पर्यटन विभागाची बैठक

सामान्यत: एखाद्या विषयाबद्दल एखाद्या आमदाराने काही सूचना सुचवल्या असतील किंवा मागणी केली असेल तर त्या आमदारांना बैठकांना बोलावलं जातं. या बैठकीसाठी युवासेना सचिव वरुण सरदेसाईही आदित्य ठाकरे यांच्या रांगेत बसलेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत युवा सेनेचे पदाधिकारी या बैठकीला हजर होते. 



याबद्दल सध्या मंत्रालयातही कुजबूज सुरू असलेली दिसतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित असलेले दिसतात. आदित्य ठाकरे हे आमदार आहेत, मंत्री नाहीत... मग ते मुख्यमंत्र्यांसोबत सचिवस्तरीय बैठकीत सहभागी होऊ शकतात का? असा प्रश्न आता विचारला जातोय.