शपथविधी सोहळ्या अगोदर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती
मुंबई : ठाकरे कुटुंबियातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आदित्य ठाकरे आज बुधवारी विधानभवनात शपथ घेणार आहे. नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरेंनी विधानभवनात येण्याअगोदर प्रभादेवीला जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. महाराष्ट्राच्या सुखासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करत आदित्य ठाकरे नव्या जबाबदारीसाठी सज्ज होणार आहेत.
आदित्य ठाकरे विधानभवनात पोहचल्यावर माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी या दिवसाकरता आनंद व्यक्त केला. आदित्य ठाकरेने सगळ्यांकडून शुभेच्छा मागितल्या तसेच प्रेम आणि आशिर्वाद राहू दे असं सांगितलं. 'आज आमदार म्हणून पहिला दिवस आहे. आजचा कामाचा दिवस आहे. महाराष्ट्रासाठी ही नवीन सुरूवात आहे. सगळ्या नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा देतो आणि देवाकडे आशिर्वाद मागतो', अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.
आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे पहिली व्यक्ती आदित्य ठाकरेच होते. यानंतर पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हा सोहळा 28 नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर होणार आहे.
गेल्या 32 दिवसांपासून प्रत्येक आमदार या सोहळ्याची वाट पाहत होतं. जनतेचा जनादेश मिळूनही नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा राजकीय घडामोडींमुळे लांबला होता. अखेर हा सोहळा आज संपन्न होणार आहे.