मुंबई: निवडणुका तोंडावर आल्याने आगामी काही दिवसांत राजकीय नेत्यांचा पक्षांतराचा खेळ सुरु होईल. मुंबईत गणेशोत्सवात लावलेल्या एका बॅनरच्यानिमित्ताने याची झलक पाहायला मिळाली. काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी दादर येथील टिळक उड्डाण पुलावर लावलेलं होर्डिंग त्यामुळेच सध्या चर्चेचा विषय झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या होर्डिंगच्या माध्यमातून कोळंबकरांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे. कोळंबकरांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा बॅनर लावला आहे. मात्र, या बॅनरवर काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसाद लाड यांची छायाचित्रे झळकत आहेत. त्यामुळे कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 


कालिदास कोळंबकर हे नारायण राणेंचे कट्टर समर्थक मानले जातात. नारायण राणेंनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता कोळंबकरही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणार असल्याचे म्हटले जाते. 


विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यानी विरोधी पक्षात असूनही कोळंबकर यांना त्यांच्या वडाळा-नायगाव या मतदारसंघातील विकास कामांसाठी भरघोस निधी देऊन कृपादृष्टी ठेवली आहे. 


गेल्या निवडणुकीत कालिदास कोळंबकर यांनी निसटता विजय मिळवला होता. त्यामुळे यंदा ते कुठलाही धोका पत्करण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वातावरणात ते भाजपच्या गळाला लागणार, असा जाणकारांचा होरा आहे.